प्रशासनाकडून शेतकऱ्यांना आवाहन; ३० नोव्हेंबर २०२५ पूर्वी अतिवृष्टी अनुदान केवायसी पूर्ण न केल्यास पोर्टल बंद होण्याची शक्यता.
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विविध टप्प्यांत जाहीर झालेल्या पीक नुकसानीच्या अनुदानाचे वाटप सुरू असून, ज्या शेतकऱ्यांचे अनुदान तांत्रिक कारणांमुळे अडकले आहे, त्यांना केवायसी (KYC) पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर केवायसीसाठी असलेले पोर्टल बंद होण्याची शक्यता असल्याने, पात्र शेतकऱ्यांनी तातडीने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
केवायसी का आवश्यक आहे?
राज्यात जून ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी तसेच त्यापूर्वी गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली आहे. यापैकी अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या फार्मर आयडी (Farmer ID) च्या आधारे थेट आधार संलग्न बँक खात्यात (DBT) रक्कम जमा करण्यात आली आहे.
मात्र, ज्या शेतकऱ्यांची नावे सामायिक क्षेत्रात आहेत, फार्मर आयडी बनलेला नाही, माहिती जुळत नाही (mismatch), वारस नोंदी किंवा इतर तांत्रिक अडचणी आहेत, अशा शेतकऱ्यांचे अनुदान थांबले आहे. या शेतकऱ्यांची ओळख पटवून त्यांच्या खात्यात अचूकपणे रक्कम जमा करण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक आहे.
केवायसी करण्याची प्रक्रिया
-
याद्या प्रसिद्ध: केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या नवीन याद्या १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
-
यादी कुठे मिळेल: या याद्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’वर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.
-
केवायसी कुठे करावी: आपले सरकार सेवा केंद्रावर (CSC) जाऊन शेतकरी एमएच-डीआयएसटी (MSDGS) पोर्टलद्वारे आधार कार्ड आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे आपली केवायसी पूर्ण करू शकतात.
अंतिम मुदतीपूर्वी केवायसी करा
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली केवायसी पूर्ण करून अनुदानाचा लाभ घ्यावा. यानंतर पोर्टल बंद झाल्यास उर्वरित शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांनी आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयात संपर्क साधून आपले नाव यादीत तपासावे आणि केवायसी शिल्लक असल्यास ती तात्काळ पूर्ण करावी.