कोईम्बतूर येथील कार्यक्रमातून निधीचे वितरण; तुमच्या खात्यात पैसे आले का? असे तपासा.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजनेच्या २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर, आज १९ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. तामिळनाडूमधील कोईम्बतूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान, देशभरातील ९ कोटींपेक्षा जास्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात १८,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.
दुपारी २ वाजल्यापासून सुरू झालेल्या या वितरणानंतर, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात दुपारनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यांना बँकेकडून तसे संदेशही (SMS) येत आहेत.
“आम्ही KYC केली, पण पैसे कधी येणार?” – शेतकऱ्यांची चिंता
हप्ता वितरित होऊनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा न झाल्याने त्यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. “आम्ही ई-केवायसी (e-KYC) पूर्ण केली आहे, मग आमचे पैसे कधी पडणार?” असा प्रश्न अनेक शेतकरी विचारत आहेत.
सर्वसाधारणपणे, केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर1 ते 2 दिवसांत पैसे खात्यात जमा होतात. मात्र, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे या प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. शासकीय पोर्टलचा वेग कमी असणे, सर्व्हरवर अतिरिक्त भार येणे किंवा जिल्ह्या पातळीवर निधी वितरणास उशीर होणे यांसारख्या कारणांमुळे पैसे जमा होण्यास 1 ते 2 दिवसांचा कालावधीही लागू शकतो.
तुमच्या खात्यात पैसे आले का? असे तपासा
शेतकरी आता घरबसल्या आपल्या हप्त्याची स्थिती तपासू शकतात. मात्र, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की पूर्वीप्रमाणे PFMS पोर्टलवरील DBT स्टेटस ट्रॅकरची सुविधा आता बंद करण्यात आली आहे.
-
अधिकृत संकेतस्थळ आणि ॲप: तुम्ही PM-Kisan योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल ॲप्लिकेशनवर ‘Beneficiary Status’ या पर्यायावर जाऊन तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती तपासू शकता.
-
सर्वर डाउनची शक्यता: हप्ता वितरणाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शेतकरी स्टेटस तपासत असल्याने वेबसाईट आणि ॲप संथ चालण्याची किंवा तात्पुरते बंद असण्याची शक्यता आहे.
-
सर्वात सोपा मार्ग: तुमच्या बँक खात्याशी जो मोबाईल नंबर लिंक आहे, त्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज आला आहे का ते तपासा किंवा थेट तुमच्या बँक खात्यातील शिल्लक तपासा.
ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली आहे, त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. शासनाने निधी मंजूर केला असून, ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आधीच जमा झाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच सर्वांना या हप्त्याचा लाभ मिळेल.